भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय

0
7

लंडन (वृत्तसंस्था): धावांचा मोठा डोंगर उभा करूनही चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला श्रीलंकेकडून पराभावाला सामोरे जावे लागले होते. मात्र आज भारताने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला.आज (रविवार) होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. आघाडीच्या फलंदाजांनी 76 धावांची भागीदारी केली. मात्र अश्‍विनच्या गोलंदाजीवर अठराव्या षटकात हशीम आमला (54 चेंडूत 35 धावा) बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकशिवाय (72 चेंडूत 53 धावा) अन्य कोणीही मैदानावर फार काळ तग धरू शकले नाही. फाफ दू प्लेसिस 50 चेंडूत 36 धावा तर एबी डिव्हीलियर्सही 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तळातील तब्बल पाच फलंदाजांना वैयक्तिक दोन आकडी धावांपर्यंत पोहोचता आले नाही. तर जीन पॉल ड्युमिनी 20 धावा करून नाबाद राहिला. भारताच्या वतीने भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रविचंद्रन अश्‍विन, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

त्यानंतर 192 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनीही संयमित खेळाचे प्रदर्शन केले. मात्र सहाव्या षटकात संघाच्या केवळ 23 धावा असताना रोहित शर्मा (20 धावा) बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाची वाट सुकर केली. शिखर धवनने 83 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या सहाय्याने 78 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 101 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. युवराज सिंहने 25 चेंडूत 23 धावा करत भारताला विजयापर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

■ अंतिम धावफलक
दक्षिण आफ्रिका : ४४.३ षटकात सर्वबाद १९१ धावा
भारत : ३८ षटकात २ बाद १९३ धावा