शाश्वत जलसंधारणामधून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री

0
10

मुंबई, दि. ११ : राज्य शासनाने अत्यंत महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. शासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. योजनेतून झालेल्या जलसंधारणाच्या विविध कामांमधून आतापर्यंत साधारण साडेबारा लाख हेक्टर जमीन संरक्षीत सिंचनाखाली आली आहे. त्याबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही या योजनेचा लाभ झाला असून साधारण ११ हजार गावे टँकरमुक्त तथा दुष्काळमुक्त करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. यापुढील काळातही शाश्वत जलसंधारण करणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची गावागावामध्ये प्रभावी अंमलबजावणी करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाचे आज विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन प्रसारण झाले. या कार्यक्रमात लोकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. ‘पाणी’ विषयावरील या कार्यक्रमासाठी राज्यभरातील साधारण १८ हजार जणांनी ई-मेल आणि एसएमएसद्वारे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे आज विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात आले.

कार्यक्रमात पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाला लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी या योजनेसाठी साधारण ५६० कोटी रुपयांचा जनसहभाग दिला. शासनाने योजनेसाठी साधारण साडेपाच हजार कोटी रुपये खर्च केले. मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारणाच्या छोट्या कामांना दिलेले हे प्राधान्य कमालीचे यशस्वी ठरले आहे. साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करुन आपण साधारण साडेबारा लाख हेक्टर इतकी सिंचना क्षमता निर्माण केली आहे. मोठ्या पाटबंधाऱ्यांच्या माध्यमातून इतकी सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी साधारण ३० हजार कोटी रुपये खर्च झाला असता. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणात बचत करण्याबरोबरच लोकांना सिंचनासाठी आणि पिण्यासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करण्यात शासन यशस्वी झाले आहे, असे ते म्हणाले.