पालघर जिल्ह्यात 15 जूनपासून पुनरागमन शिबीरांचे आयोजन

0
16

मुंबई, दि. 14 : पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या हंगामात आदिवासी बांधवांना पाड्यावर जाऊन धान्य वितरणासाठी धान्य महोत्सव संकल्पना राबविण्यात येणार आहे. दिनांक 15 जून पासून पुनरागमन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये माता-पित्यांसोबत स्थलांतरीत झालेले आणि आता परतलेल्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कुपोषण निर्मूलनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मोखाड्यामध्ये एकही बालमृत्यूची घटना आढळून आली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री व कुपोषण निर्मुलन टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी पालघर टास्क फोर्स समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते.

ऑक्टोबर 2016 मध्ये पालघर कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत या टास्क फोर्सच्या चार बैठका झाल्या असून पालघर येथे एक बैठक घेण्यात आली. कुपोषण निर्मूलनासाठी आदिवासी विभाग, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग यांच्या योजनांच्या समन्वयासाठी प्रयत्न केले जात आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्ह्यात कुपोषणाच्या बाबतीत 26 संवेदनशील पाडे असून 15 जूनपासून या पाड्यांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे सांगून डॉ. सावंत पुढे म्हणाले की, या भेटीदरम्यान सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचा गट तयार करुन कुपोषित बालकांच्या संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कुपोषित बालकांची माहिती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी बांधव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये रोजगारासाठी स्थलांतर करतात. आई-वडिलांसोबत लहान मुले देखील स्थलांतरीत होतात. ही मंडळी जूनमध्ये पुन्हा पाड्यावर परतात. अशा परत आलेल्या माता व मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुनरागमन शिबिर आयोजित करण्यात येणार असून खाजगी बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येईल. या शिबिरांच्या माध्यमातून अतितीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. ज्या भागात स्थलांतर होते तेथील आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून स्थलांतरीत झालेल्या बालकांवर उपचार व तपासणी देखील करण्यात येणार आहे.पालघर जिल्ह्यात झालेल्या बालमृत्यूचे ऑडिट करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मदर चाईल्ड ट्रॅकिंग प्रकल्पाच्या माध्यमातून गरोदर माता व बालक लसीकरण सेवांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या माध्यमातून मातामृत्यू, अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.