शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस

0
7

पंढरपूर दि.4:– विठूराया… राज्यातील शेतकरी कर्जमाफी नंतर कर्जमुक्ती झाल्याशिवाय सुखी होणार नाही. विठूराया तू वंचितांचा देव आहेस. राज्यातील शेतकरी आणि वंचितांना न्याय देण्यासाठी सामर्थ्य दे असे साकडे आपण आज (मंगळवार) श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्‍मिणीची महापूजा करताना मंदिराच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या एका दांम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान दरवर्षी दिला जातो. यंदा हा मान बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्‍यातील बाळसमुद्र येथील परसराव मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया मेरत यांना मिळाला. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते नित्यपूजा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी मंदिरात आगमन झाले. दोन वाजून वीस मिनिटांनी श्री विठ्ठलाकडील महापूजेला सुरुवात झाली. विठूरायाच्या मूर्तीवर दूध आणि दही स्नान घातल्यानंतर विठूरायाची स्वयंभू मूर्ती विलक्षण दिसत होती. त्यानंतर सावळ्या विठूरायाला पितांबर आणि पिवळ्या रंगाचा रेशमी काठ असलेली सुंदर नक्षीकाम केलेला अंगरखा घालण्यात आला. सोन्याचा टोप घालून नंतर तुळशीचे व लाल-पांढऱ्या फुलांचे आकर्षक हार घालण्यात आले. कपाळी गंध लावून त्यावर तुळशीचे पान लावण्यात आल्यावर राजस सुकुमाराचे रुप अधिकच खूलून दिसू लागले. उपस्थित अनेकांना मोबाईल मध्ये विठूरायाचे छायाचित्र काढण्याचा मोह अनावर झाला. आरती झाल्यानंतर सर्वांनी “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल” असा जयघोष केला. श्री रुक्‍मिणीमातेची देखील परंपरेप्रमाणे पूजा करण्यात आली.

मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.भोसले व सौ.भोसले यांच्या हस्ते फडणवीस आणि मेरत दांम्पत्याचे तसेच उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. विठूरायापुढे अभंगवाणी कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेल्या अनुराधा पौंडवाल व पंडीत आनंद भाटे यांचेही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

पंढरपूर अर्बन बॅंकेचे संचालक एस.पी.कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी आभार मानले.