केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी घेतला सामाजिक न्याय विभागाचा आढावा

0
10

मुंबई.दि.15 : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली.या बैठकीत परदेश शिष्यवृत्ती, मॅट्रीकेतर शिष्यवृत्ती तसेच विविध योजना याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधु,सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अनुदान विहित वेळेत मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. मागासवर्गीय जनतेच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या महामंडळाचे भागभंडवल वाढविणे आवश्यक आहे. यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केल्या.