वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र,विधान भवन तर्फे”अजातशत्रू” स्मृतिग्रंथाचे मंगळवारी प्रकाशन

0
29

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवंगत माजी राज्यपाल श्री. रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेस होण्यासाठी “अजातशत्रू” या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनी उद्या मंगळवार, दि. २५ जुलै रोजी, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी नितीन गडकरी मंत्री तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उप सभापती, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, श्रीमती कमलताई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दिवंगत श्री. रा.सू.गवई यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम करताना आपल्या उल्लेखनीय योगदानाने संसदीय कामकाजावर आपला ठसा उमटविला आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळी, शिक्षण अशा बहूविध क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी दादासाहेबांचे कौटुंबिक व आत्मीय अनुबंध होते. त्यांच्या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मान्यवरांनी आपल्या लेखांद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेकविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. दादासाहेबांनी पीठासीन अधिकारी म्हणून दिलेले उल्लेखनीय योगदान, भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारी सामाजिक न्यायाची चळवळ पुढे नेण्यासंदर्भातील त्यांचे महत्वाचे कार्य, विधिमंडळ आणि संसदेत त्यांनी व्यक्त केलेले प्रेरक विचार, त्यांची दुर्मीळ छायाचित्रे आणि त्यांच्या संदर्भातील मान्यवरांनी लिहिलेल्या भावस्पर्शी आठवणी या सर्व बाबींचा स्मृतिग्रंथात समावेश असल्याने हा स्मृतिग्रंथ एक अमूल्य असा दस्तावेज म्हणून ओळखला जाईल. या स्मृतिग्रंथातील संदर्भ व माहिती राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींना निश्चितच मोलाचे मार्गदर्शन व प्रबोधन करणारी ठरणार आहे.
सदर स्मृतिग्रंथाची पृष्ठसंख्या ५९५ इतकी असून क्राऊन साइज आकारातील या स्मृतिग्रंथात सर्वसाधारण चार भाग आहेत. ज्यात दादासाहेब गवई यांनी व्यक्त केलेले विचार, विधिमंडळ आणि संसदेतील त्यांची भाषणे, त्यांच्या जीवनकार्यावरील मान्यवरांचे लेख, त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र त्याचप्रमाणे त्यांच्या निर्वाणानंतर सभागृहातील शोकप्रस्ताव आणि मान्यवरांची आदरांजली यांचा या ग्रंथात समावेश आहे. दासाहेबांचे व्यक्तिमत्त्व सर्वपक्षीय नेत्यांना आपलेसे वाटणारे होते. सर्व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे लेख,ज्येष्ठ पत्रकारांनी जागविलेल्या दादासाहेबांच्या आठवणी, सभागृहात दादासाहेबांनी व्यक्त केलेले विचार अशा सर्व गोष्टी एकत्रितपणे या स्मृतिग्रंथात वाचावयास मिळतील. ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे, औरंगाबाद यांची प्रस्तावना या स्मृतिग्रंथाला लाभली आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेल्या संसदीय लोकशाहीतील बलस्थानांविषयी आस्था असणाऱ्या सर्वांना हा स्मृतिग्रंथ सादर समर्पित करणारी वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका या स्मृतिग्रंथात आहे.