युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव

0
14

गडचिरोली,दि.२४: अहेरी येथे कार्यरत परिचारिका प्रीती आत्राम यांचा रक्ताअभावी जीव गेल्याने संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालून रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
प्रीती आत्राम ह्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका पदावर कार्यरत होत्या. सिकलसेल आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना तातडीने रक्ताची आवश्यकता असूनही रक्त उपलब्ध करुन देण्यात आले नाही. त्यामुळे २१ जुलैला त्यांनी प्राण सोडला. या घटनेमुळे जिल्हाभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रीती आत्राम यांच्या मृत्यूस रक्त संक्रमण अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.खंडाते यांना घेराव घातला.प्रीती आत्राम परिचारिका असल्याने स्वत: पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करीत होत्या. परंतु त्यांनाच रक्ताअभावी प्राण गमवावा लागला, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. रक्तसंक्रमण अधिकाऱ्याच्या विरोधात अनेकदा तक्रारी करुनही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना केला. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली.या आंदोलनात युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,कुणाल पेंदोरकर,एजाज शेख,नीतेश राठोड,रजनिकांत मोटघरे, दीपक ठाकरे, विजय अमृतकर, मिलिंद खोब्रागडे, नंदू खानदेशकर, कमलेश खोब्रागडे, गौरव आलाम, तौफिक शेख, मिलिंद किरंगे, आशिष कन्नमवार, कवडू कुळमेथे, राकेश गणवीर, प्रतीक बारसिंगे, प्रशांत कोराम, भूषण भैसारे, शारिक शेख, शंकर दास, रुचित वांढरे, सागर आल्लूरवार, दिलिप कापकर, मनिष मेश्राम, स्वप्नील बैलनवार, नंदू सोमनकर, दिनेश मादेशवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.