आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द -मंत्री विष्णू सवरा

0
23

पुणे दि.10: आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘पेसाङ्क कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले.
येथील बालगंधर्व रंगमंदिरात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार,तसेच संकेतस्थळ व मोबाईल ॲपचा शुभारंभ श्री.विष्णू सवरा यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास व वन विभागाचे राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आमदार डॉ. अशोक ऊइके, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार पास्कल धनारे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, आदिवासी विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश जगदाळे उपस्थित होते.
श्री. विष्णू सावरा म्हणाले, आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आदिवासी मुलांना शासनाच्यावतीने प्रत्येक शहरातील नामांकित शाळेत संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा विकास होत आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या वसतिगृहात राहण्याची सोयी करुन दिल्या जात आहेत. स्पर्धा परिक्षेसाठी आदिवासी मुलांसाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्यात येते. तसेच आदिवासी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शासनाच्यावतीने सत्कार करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आदिवासी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याचे आवाहन श्री. सवरा यांनी केले.
राजे आम्ब्रीशराव म्हणाले, आदिवासी मुलांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. मुलांमधील गुणवत्ता हेरून त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची गरज आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे आदिवासी मुले विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. सर्व समाजाच्या उत्थानासाठी ही आवश्यक आहे.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, माया इवनाते, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार डॉ. अशोक ऊइके यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी रेला, तारपा आणि किंगरी ही पारंपारिक नृत्य सादर केले. यावेळी १० वी, १२ वी सह विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या १२२ विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ुुुwww.mahatraibal.gov.in या संकेत स्थळासह ‘आदिवासी विकास ॲपङ्क हे मोबाईल ॲप व आदिवासी विकास विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा वर्मा यांनी केले. तर आभार रामंचद्र कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आदिवासी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.