15 हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मंजुरी — पालकमंत्री दिलीप कांबळे

0
15

हिंगोली, दि. 15: जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक वर्षापासून करण्यात येणाऱ्या पाठपूराव्याची दखल घेवून मा. राज्यपाल यांनी 15 हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मंजुरी दिली असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, मा. राज्यपाल यांनी जिल्ह्याचा 15 हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंजूरी दिली असून, यानुसार जलसंपदा विभागाने 1 हजार 200 कोटी तर जलसंधारण विभागाने 800 कोटी असा एकूण 2 हजार कोटी रुपयांचा भौतिक आणि आर्थिक नियोजनाचा प्रारुप आरखडा तयार केला आहे. तसेच नुकतेच राज्य शासनाने नदी पुर्नजीवन कार्यक्रमातंर्गत कयाधु नदीवर सेनगाव तालूक्यात 7 सिमेंट नाला बांध कामास मान्यता दिली असून याकरीता दीड कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.
जलयुक्त अंतर्गत नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासह विविध प्रकल्पांतून 35 लक्ष घनमीटर गाळ लोकसहभागातून शेतजमीनीवर टाकल्याने सुमारे 2 हजार हेक्टर शेतजमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. या अभियानाच्या यशस्वीतेमुळे 10 हजार टि.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाल्याने 21 हजार हेक्टर जमिनीला एक संरक्षित पाणी देणे शक्य झाले आहे. ʿमागेल त्याला शेततळेʾ योजनेतंर्गत जिल्ह्यात दीड हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यापैकी 1 हजार 134 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
राज्य शासनाने मनरेगा अंतर्गत समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेमध्ये जिल्ह्यास दोन वर्षाकरीता 10 हजार अहिल्यादेवी सिंचन विहिरी मंजूर केल्या आहेत. याकरीता ग्रामसभा घेऊन 8 हजार 853 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 1 हजार 110 विहिरींना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामध्ये 707 विहिरींची कामे प्रत्यक्षात सुरु आहेत.
सन 2017-18 खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. परंतू ऑगस्ट महिन्याचा दूसरा आठवडा संपला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 34 टक्के इतका कमी पाऊस पडल्याने पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतू जिल्ह्यातील 1 लाख 66 हजार 421 शेतकरी प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी झाल्याने ते संरक्षीत झाले आहे.डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्ननायझेशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एकुण 697 गावापैकी आज रोजी 73 गावातील संगणकीकृत 7/12 अद्यावत करुन आज स्वातंत्र्य दिनी जनतेला ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत असून उर्वरीत गावातील 7/12 देखील लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री कांबळे म्हणाले.
नॅशनल डेअरी विकास बोर्ड (NDDP) यांच्या मदतीने दूध उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात जिल्ह्याचा समावेश झाल्याने दुध उत्पादन वाढीसाठी आणि संकलनासाठी मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षक हे 100 टक्के तंत्रस्नेही झाले असून या पध्दतीने तंत्रस्नेही होणारा हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत 563 ग्रामपंचायतींपैकी सन 2016-17 मध्ये 103 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. तर जुलै-2017 अखेर 563 पैकी 194 ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परिषदांना राज्य शासनाने हगणदारी मुक्त घोषित केले आहे. तर नवनिर्मित औंढा नागनाथ आणि सेनगाव नगर पंचायतींना नुकतेच जिल्हास्तरीय समितीने हगणदारी मुक्त घोषित केले आहे. हिंगोली शहराला नगर परिषदेमार्फत राज्यशासनाने 73 कोटीची भुयारी गटार योजना मंजूर केली असून राज्य शासनाने याकरीता 28 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. सेनगाव शहरातील 10 हजार लोकसंख्येकरीता सेनगाव नगर पंचायतीला राज्य शासनाने 12.85 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. तसेच हिंगोली नगर परिषदेला हिंगोली शहराचा अंतर्गत विकास करण्यासाठी राज्य शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे ही पालकमंत्री कांबळे यांनी सांगितले.
ब्रह्मांडातील गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी लिगोच्या दोन प्रयोगशाळानंतर जगातील तिसरी प्रयोगशाळा ही हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात होणार आहे. त्यासाठी 173.37 हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी 5.94 हेक्टर शासकीय जमीनीचा ताबा अणु ऊर्जा विभागाला देण्यात आला आहे.
वैद्यकिय शिक्षण विभागाद्वारे सर्व सहकारी विभागासोबत यावर्षीही 29 व 30 ऑगस्ट, 2017 रोजी दोन दिवसाचे महा अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. ‘त्याग आणि दान हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असला तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण या विषयाला एक महत्व प्राप्त करुन देऊ या ! चला महा अवयवदान कार्यक्रमास एका वेगळ्या उंचीवर नेऊ या !’ असे आवाहन ही पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी नागरिकांना केले.
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात संगणकीकृत 7/12 चे वितरण करण्यात आले. तसेच कु. रुतीका हाके या विद्यार्थींनीचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा 2017 पुरस्कार आणि श्री. विजय बांगर आणि श्री. मुकूंद पवार या शिक्षकांचा जिल्हा तंत्रस्नेही पुरस्कार देवून पालकमंत्री श्री. कांबळे यांनी सत्कार केला.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर, तहसीलदार विजय अवधाने, नगर परिषद हिंगोलीचे मुख्यधिकारी रामदास पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.ध्वजारोहण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मदन मार्डीकर यांनी केले.