राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये थॅलेसेमियाची तपासणी मोफत होणार- आरोग्य राज्यमंत्री देशमुख

0
9

मुंबई,दि.23 : सध्या राज्यातील सहा ठिकाणी थॅलेसेमिया मायनर तपासणी मोफत करण्यात येते, लवकरच राज्यातील 18 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या पालकांसोबत विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. देशमुख बोलत होते.
थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या विविध मागण्यांसाठी रूग्णांच्या पालकांनी 10 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी पालकांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांसंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन श्री. देशमुख यांनी त्यावेळी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयीन दालनात रूग्णांच्या पालकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, सहायक संचालक डॉ. गिरीश चौधरी, डॉ. अरूण थोरात यांच्यासह सुनील वर्तक, संतोष पाटील, शैलेंद्र कांबळे, दर्शना उपाध्याय, नरेश शेंडे, इश्तीयाक अहमद शेख, निलेश जगताप, सूर्यकांत पारधे, अनिता कोटणकर, रतन चव्हाण आदी पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा रूग्णालयात गोळ्यांचा पुरवठा त्वरित करावा, थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत करण्यात यावी व ती सर्व जिल्ह्यांमध्ये व्हावी, थॅलेसेमिया रूग्णांसाठी NAT टेस्ट रक्त मोफत मिळावे, अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा रूग्णालयातून प्रमाणित करून द्यावे या मागण्या पालकांच्या प्रतिनिधींनी मांडल्या.
ठाणे जिल्हा रूग्णालयात 60 हजार गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. यासह राज्यातील ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, केईएम रूग्णालय, मुंबई व बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या सहा ठिकाणी थॅलेसेमिया मायनर टेस्ट मोफत करण्यात येते. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधूदुर्ग, जालना, परभणी, उस्मानाबाद आणि बीड या अतिरिक्त 10 ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार आहे. नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी नवीन डे केअर सेंटर चालू करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 18 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री श्री. देशमुख यांनी दिली. दरम्यान, प्रत्येक स्त्री रोग तज्ञांकडे थॅलेसेमिया तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात स्त्री रोग तज्ञांची संघटना फॉक्सी यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून ही तपासणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांना आवाहन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. थॅलेसेमिया ओैषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही श्री. देशमुख यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
50 निवडक रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असतील प्रतिनिधी
थॅलेसेमिया रूग्णांना रक्त मिळण्यासाठी अडचणी येऊ नये म्हणून स्वयंसेवी संस्थांच्या 50 निवडक रक्तपेढ्यांमध्ये थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांचे प्रतिनिधी उपलब्ध राहतील व ते रूग्णांना रक्त मिळवून देण्याची व्यवस्था करतील, या 50 रक्तपेढ्यांचे शासनातर्फे बळकटीकरणही करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री श्री. देशमुख यांनी आजच्या बैठकीत दिली. दरम्यान, 15 जुलै रोजी संसदेत अपंगत्वाचे बील संमत झाले असून यामध्ये थॅलेसेमिया रूग्णांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील पॉलीसी दीड ते दोन महिन्यात उपलब्ध होणार आहे, त्यानुसार अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी सकारात्मक योजना तयार करण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
गर्भधारणेनंतर तपासणी आवश्यक
थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्ती या निरोगी असतात, त्यांना थोडा अशक्तपणा असतो. या व्यक्ती निरोगी असल्या तरी त्या थॅलेसेमिया आजाराच्या वाहक असतात. दोन वाहकांचा विवाह झाल्यास 25 टक्के संततीस थॅलेसेमिया मेजर आजार होऊ शकतो. तसेच 50 टक्के संतती ही थॅलेसेमिया आजाराची वाहक असते व 25 टक्के सामान्य संतती होऊ शकते. विवाह करणारे जोडीदार थॅलेसेमिया आजाराचे वाहक असल्यास गर्भधारणेनंतर थॅलेसेमिया आजार नसल्याबाबतची तपासणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.