कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ

0
13

मुंबई,23- राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यातील ६ विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांसाठी प्रत्येकी एक अशी ६ तसेच ३५ जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे
३५ अशी एकूण ४१ विधी अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आली आहेत. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यासाठी १ कंत्राटी विधी अधिकारी व १ अस्थायी लघुटंकलेखक (इंग्रजी) अशी दोन पदेदेखील मंजूर करण्यात आली आहेत. कंत्राटी विधी अधिकारी यांचे सध्याचे मानधन दरमहा २० हजार रुपये आणि दूरध्वनी व प्रवास खर्चासाठी ५ हजार रुपये असे आहे. त्यांच्या मानधनामध्ये वाढ करुन त्यांना दरमहा ३० हजार रुपये आणि दूरध्वनी व प्रवास खर्चासाठी ५ हजार रुपये असे एकूण ३५ हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे.
न्यायालयीन प्रकरणात परिच्छेदनिहाय अहवाल तयार करणे, शपथपत्र तयार करणे तसेच न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करुन शासनाची बाजू मांडण्यासाठी वकिलांना सहाय्य करण्याची कामे हे विधी अधिकारी करतात.