अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे नियमित पदांवर समावेशन

0
21

मुंबई,दि.30-सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयातील ७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे (गट- ब) रिक्त असलेल्या नियमित पदांवर विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी एकवेळचे समावेशन करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
आरोग्य सेवा संचालनालयातील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकार्‍यांची (गट-ब) पदे सातत्याने प्रयत्न करूनही भरली जात नाहीत. त्यामुळे ही पदे ११ महिन्याच्या कालावधीसाठी अस्थायी स्वरुपात भरण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, आयुर्वेदिक व अलोपॅथिक दवाखाने, तरंगते दवाखाने तसेच आरोग्य विभागांव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालयांना त्यांच्या दवाखान्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून बीएएमएस वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तया करण्यात येतात. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेले ७३८ अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा संचालनालयात कार्यरत आहेत. या अधिकार्‍यांचे नियमित सेवेत समावेशन करण्याची मागणी वेळोवेळी अस्थायी वैद्यकीय अधिकारी संघटनेमार्फत करण्यात आली आहे. सध्या आरोग्य विभागाकडील नियमित आस्थापनेवर मंजूर असणार्‍या वैद्यकीय अधिकारी (गट-ब) संवर्गातील १0६६ पदांपैकी ४४८ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असणार्‍या ७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे सेवाज्येष्ठतेनुसार या रिक्त पदांवर समावेशन करण्यात येणार आहे. उर्वरित २९0 अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध असणार्‍या गट- ब संवर्गातील ३२0 पदांवर समावेशन करण्यात येईल. अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे समावेशन ९३00-३४८00 आणि ग्रेड पे ४६00 या वेतनश्रेणीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर निश्‍चित करण्यात येणार आहे. समावेशित अधिकार्‍यांना पूर्वलक्षी लाभ देण्यात येणार नाहीत. समावेशनाच्या दिनांकास प्रचलित सेवाविषयक बाबी पूर्ण करणे संबंधितांना बंधनकारक राहणार असून समावेशन केलेल्या दिनांकापासून नियमितीकरणाचे लाभ मिळणार आहेत. ज्येष्ठताक्रम व पदांच्या उपलब्धतेनुसार या अधिकार्‍यांचे समावेशन करण्यात येणार आहे.