मेडिकलच्या महाअवयवदान रॅलीने वेधले लक्ष

0
14

नागपूर,दि.30-‘तुमचे अवयवदान ठरू शकतो इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण’, ‘अवयव दान महादान’, ‘मरावे परी देहरुपी उरावे’, आदी विविध घोषवाक्ये देत भरपावसात निघालेल्या ‘महाअवयव दान’ रॅलीने मंगळवारी सकाळी शहरवासियांचे लक्ष वेधले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित अवयवदान जनजागृती महोत्सवानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये तीन हजारावर डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचार्‍यांचा समावेश होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पुढाकाराने आयोजित या रॅलीला महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे उपस्थित होते. मेडिकलच्या क्रीडांगण येथून निघालेली ही रॅली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, क्रीडा चौक, मेडिकल चौक मार्गक्रमण करीत मेडिकलच्या क्रीडांगणावर पोहचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
पाऊस सुरू असतानाही शिस्तबद्ध पद्धतीने रॅली निघाली. विशेषत: रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच बहुसंख्य वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये मेडिकल महाविद्यालयासोबतच, शासकीय दंत महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), धनवटे नॅशनल महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, शिवाजी विज्ञान महाविद्यालय व मेडिकलच्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीमध्ये उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. राज गजभिये, डॉ. रमेश पराते, डॉ. अशोक मदान, डॉ. नरेंद्र तिरपुडे, डॉ. उदय नार्लावार, डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. समीर गोलावार, डॉ. गणेश डाखळे, डॉ. श्रीखंडे आदी उपस्थित होते. रॅलीच्या आयोजनासोबतच इतर विविध स्पर्धा व माहितीपर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी डॉ. उदय नार्लावार यांच्या मार्गदर्शनात महाअवयवदान कोऑर्डिनेटर डॉ. अविनाश गावंडे, डॉ. बागडे, डॉ. वाधवा, डॉ. पाटील, डॉ. लांजेवार, डॉ. मेर्शाम, डॉ. जोगुलवार यांच्यासह पीएसएम विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी पर्शिम घेतले.पथनाट्यातून दिला अवयवदानाचा संदेश
मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या पथनाट्यातून अवयवदानाचा संदेश दिला. याशिवाय अवयवदानाला घेऊन रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व मार्गदर्शन कार्यशाळासुद्धा घेण्यात आली.