अजित पवार, तटकरेंविरोधातील तक्रारी मागे का घेतल्या?- खडसेंचा दमानियांना सवाल

0
13
मुंबई,दि.06- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप मी फेटाळून लावतो. मी कुणाचाही अवमान, अनादर होईल असे वक्तव्य केलेले नाही त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. मी त्यांना गेल्या चार-पाच वर्षात एकदाही भेटलो नाही तरीही त्या माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आहेत. यामागे नक्कीच काहीतरी शिजत आहे, अन्यथा फक्त मलाच टार्गेट केले नसते अशा शब्दांत माजी मंत्री अंजली दमानिया यांनाच लक्ष्य केले. याचसोबत माजी मंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्याविरोधातील सिंचन घोटाळ्या संबंधित केलेल्या तक्रारी व याचिका माघारी का घेतल्या असा सवाल करत दमानिया यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंनी अश्लिल वक्तव्य करत माझा बदनामी होईल असे भाष्य केल्याचे सांगत त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याला खडसे यांनी आज सायंकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिले.
खडसे म्हणाले, अंजली दमानिया यांनी माझ्या वार्षिक उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिली आहे. माझ्या संपत्तीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती कोर्टात सादर करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण काहीही चुकीचे केल्याने कशालाही घाबरत नाही. मी राजकारणात असलो तरी माझ्या आजोबापासून माझ्या कुटुंबियांकडे शेकडो एकर जमिन आहे. गेल्या 30 वर्षापासून माझ्या संपूर्ण बागायती शेतीतून मला लाखो रूपये उत्पन्न मिळत आहे. दमानिया या माझे चार वर्षापूर्वी एवढे होते तर मग आता एवढे कसे झाले असे विचारत आहेत. माझ्या शेतात फळझाडे आहेत. चार वर्षापूर्वी लावलेली सिताफळे, आंब्यांची झाडे लहान होती. आता ती मोठी झाली आहेत. त्या फळबागातून मला मोठे उत्पन्न मिळाले. ज्या जाहीर भाषणांचा उल्लेख करून त्या गुन्हा दाखल करण्याची व अटक करण्याची मागणी करत आहेत तेथेही मी हेच बोललो होतो. त्यात गैर असे काहीही नाही किंवा कुणाचा अनादर करण्याचा विषय नाही. महिलांचा तर नाहीच नाही. आम्ही असेच बोलतो व वागतो. तरीही त्या भाषणात मी कोणाचेही नाव घेतले नाही त्यामुळे मी केलेले वक्तव्य संबंधित व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांला आपल्यावर का ओढून घ्यावे, असेही खडसेंनी आपल्या आरोपांवर बोलताना स्पष्टीकरण दिले.