‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

0
27
पुणे,दि.08(विशेष प्रतिनिधी)- आपण ब्राह्मण तसेच सुवासिनी असल्याचे खोटे सांगून एका ब्राह्मण कुटुंबात सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असा गुन्हा दाखल करता येतो का चाचपणी करत पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, फिर्यादी गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी नमते घेत अखेर त्या महिलेवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हवामान विभागाच्या माजी संचालिका व वैज्ञानिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.
 या प्रकाराची नेमकी तक्रार कशी दाखल करुन घ्यावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तक्रार करू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून तसेच समाजातील मान्यवरांकडून डॉ. खोले यांची समजूत घातली जात होती. मात्र, फिर्याद दाखल करून घेण्यावर त्या ठाम राहिल्या. त्यामुळे पोलिसांना भारतीय दंडविधान संहिता कलम ४१९ (फसवणूक), कलम ३५२ (हल्ला करणे) आणि कलम ५०४ (धमकी) अन्वये गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खोले या दरवर्षी आपल्या घरी गौरी-गणपती बसवितात. तसेच आई-वडिलांचे श्राद्धही घालतात. त्यासाठी त्यांना सोवळ्यातच स्वयंपाक करणारी महिला हवी होती. मे 2016 मध्ये त्यांच्याकडे एक महिला काम करण्यास तयार झाली. तसेच तिने आपले नाव निर्मला कुलकर्णी असल्याचे सांगत आपण ब्राम्हण व सुवासिनी असल्याचे सांगितले. आपण सोवळ्यात स्वयंपाक करतो असेही त्या महिलेने सांगितले.
                मे 2016 मध्ये वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी तसेच सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी तसेच 2017 मध्ये वडीलांच्या श्राद्धासह गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. दोन वर्षात त्यांनी एकूण सहा वेळा स्वयंपाक केला. बुधवारी निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असे खोटे नाव का सांगितले,  आमच्या घरी केवळा ब्राह्मण समाजातील सुवासिनी बाईने केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. यावरून निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
 नुकताच झालेला गौरी-गणपतीच्या काळातही त्या महिलेने स्वयंपाक केला. मात्र, यावेळी पूजा करण्यासाठी खोलेंकडे आलेल्या ब्राह्मण गुरूजीने संबंधित महिला ब्राह्मण नसल्याचे सांगितले. त्यामुळे खोलेंनी संबंधित महिलेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्या महिलेने आपले नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. अधिक विचारणा केली असता निर्मलाने शिवीगाळ केल्याची व अंगावर धावून आल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली आहे.
खोले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

जात लपवून स्वयंपाकाचे काम मिळवल्याप्रकरणी वयस्कर महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या डॉ. मेधा खोले यांच्याविरुद्धही याप्रकरणी संबंधित महिलेने मारहाणीचा तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. निर्मला दत्तात्रय यादव (वय 80, रा. समर्थ अपार्टमेंट, रायकर मळा, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.यादव या खोले यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करीत होत्या. या कामाचे पैसे त्यांनी दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खोले यांनी गुरुवारी त्यांच्या घरी जाऊन तुम्ही मला निर्मला दत्तात्रय कुलकर्णी असल्याचे खोटे का सांगितले असे विचारले. तेव्हा यादव यांनी माझे खरे नावच मी तुम्हाला सांगितले होते असे सांगत असतानाच खोले यांनी शिवीगाळ करीत हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मारहाणीचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.