राज्यात दोन नदीजोड प्रकल्प – गडकरीची घोषणा

0
8

मुंबई, दि. 8 –  राज्यातील सिंचनाखालील जमीन 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प आम्ही केला असून, त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात दोन नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या जलसिंचन आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.
राज्यातील आणि देशातील जलसिंचन आणि पाणीप्रश्नाबाबत बोलताना गडकरी म्हणाले,”राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र 40 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी येत्या दोन वर्षांत 55 ते 60 हजार कोटी रुपये आणण्याचा माझा प्रयत्न आहे.”
महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाविषयी माहिती देताना गडकरींनी सांगितले की, देशात नदीजोड प्रकल्पावर विचार सुरू आहे. त्यात राज्यात दोन नदीजोड प्रकल्पांबाबत चर्चा सुरू आहे. या दोन प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न सुटू शकेल, असेही गडकरींनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जलसिंचन प्रकल्पांबाबत माहिती देताना सांगितले की,”प्रधानमंत्री योजनेंतर्गत राज्यात 26 प्रकल्प सुरू आहेत. या 26 प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. तसेच राज्यातील रस्तेप्रकल्पांसाठी केंद्राकडून  भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.”