स्वाईन फ्ल्यू : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आरोग्य यंत्रणेची बैठक

0
21

गोंदिया,दि.८ : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली ८ सप्टेबर रोजी त्यांच्या कक्षात स्वाईन फ्ल्यू बाबतची आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.काळे यावेळी म्हणाले, सडक/अर्जुनी तालुक्यातील फुटाळा गावात काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. फुटाळा गावासोबतच इतर गावांमध्ये स्वाईन फ्ल्यू एच-१ या आजाराची लागण होणार नाही या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत जनजागृती आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात यावी. तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचारात्मक औषोधोपचार, विलगीकरण कक्ष तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीबाबतची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोबतच आरोग्य यंत्रणेनी या आजाराबाबत दक्ष राहावे असे सांगितले.
नागरिकांनी या आजाराबाबत खबरदारीचे पालन करावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, खोकतांना किंवा शिंकतांना तोंडावर रुमाल धरावी. रोगी व्यक्तीने वापरलेले रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीचा वापर करु नये. साबण व पाण्याचा वापर करुन वारंवार हात धुवावे. सर्दी, खोकला यासारखे लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्दी, खोकल्याचा संसर्ग झाल्यास जास्त लोकांच्या गर्दीत जाणे टाळावे व घरच्या घरी राहण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.