लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू- प्रा. राम शिंदे

0
8

मुंबई, दि.20 : लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात  राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले.लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने यासंबंधीचे निवेदन मंत्री
प्रा. राम शिंदे यांना देण्यात आले. यावेळी मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रा. शिंदे बोलत होते.
राज्य शासनाने लिंगायत समाजातील 9 पोटजातींचा समावेश इतर मागास प्रवर्गामध्ये तर तीन पोटजातींचा समावेश विशेष मागास प्रवर्गात केला आहे. लिंगायत समाजातील इतर पोटजातींचा समावेश इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. या सुनावणीचा अहवाल मिळण्यासाठी आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, सहसचिव श्री. गावित, समितीचे समन्वयक ओमप्रकाश कोयटे, अध्यक्ष सुनील रुकारी, नरेंद्र व्यवहारे, माजी आमदार मनोहर पटवारी आदी यावेळी उपस्थित होते.