भाजपच्या समितीतून किरीट सोमय्यांना वगळलं!

0
8
मुंबई,दि.01- मुंबईतील रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करणाऱ्या समितीत भाजप खासदार किरीट सोमय्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर दांडिया खेळायला गेल्याचा सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रश्नावर पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आशिष शेलारांसह मधू चव्हाण, भाई गिरकर, प्रभाकर शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
 एलफिन्स्टन स्टेशनच्या पुलावर चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात दंग असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार मुंबईकरांच्या समस्यांबद्दल संवेदनशील आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आधीचा आहे की नंतरचा, याबाबत मात्र अद्याप खातरजमा झालेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियातही किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, खासदार किरीट सोमय्या यांची या व्हिडीओबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.