शेतक-यांच्या १९ बळींमागे सरकारची निष्क्रियता, यंत्रणेचा भ्रष्टाचार -विखे

0
15

यवतमाळ,दि.05 : राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.तत्पूर्वी सकाळी राधाकृष्ण विखे नागपूरवरून कळंब तालुक्यात दाखल झाले. त्यांनी विषबाधेने बळी गेलेल्या कळंब येथील देविदास मडावी या शेतक-याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी यवतमाळात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गाठून विषबाधित रुग्णांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही त्यांनी उपस्थिती नोंदवून प्रकरणाचा आढावा घेतला.
विषबाधा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी विखे गुरूवारी जिल्ह्यात आले. येथील शासकीय रूग्णालयात विषबाधितांशी संवाद साधून त्यांनी नंतर विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या घटनेत कृषी विभागाने अक्षम्य हलगर्जीपणा केला. नंतर आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनीही दुर्लक्ष केले. यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणेनेसुद्धा हा विषय गांभीर्याने घेतला नाही. एकूणच संपूर्ण यंत्रणेचा बेजबाबदारपणा यातून उघड झाला. या सर्वांना त्वरित निलंबित करण्याची मागणी विखे यांनी केली.
कृषीमंत्री, कृषी आयुक्तांना वेळ नाही. या सरकारला माणसांचा जीव स्वस्त आहे असे वाटते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कीटकनाशके सदोष आणि कालबाह्य असावी, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. यात कृषी अधीक्षक अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि व्यापाºयांचे संगनमत असून या सर्वांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण यंत्रणा खिळखिळी झाली असून पीकेव्हीच्या शास्त्रज्ञांनाही काय चालले याची माहिती नाही. राज्यात केवळ ‘चला हवा येऊ द्या’ आणि शिवसेनेचे ‘चला सत्ता सोडू द्या’, हे दोनच विनोदी कार्यक्रम सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजीमंत्रीव्दय प्रा.वसंतराव पुरके व अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, माजी आमदारव्दय विजय खडसे व विजयाताई धोटे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आदी उपस्थित होते.