निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी, हायकोर्टाचे राज्‍य सरकारला आदेश

0
16
मुंबई,दि.11-दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रातही फटाक्यांवर संक्रांत आली आहे. ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ राज्यातील निवासी भागातील फटाके विक्रीवर बंदी तसेच निवासी भागात फटाके विक्री दुकानांना परवाने न देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.फटाके विक्री दुकानांच्या परवान्यांची संख्याही अर्ध्याने कमी करण्यास सांगितले. फटाके विक्रीसंबंधी सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिलेल्या आदेशांचे राज्यातही पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही कोर्टाने यंत्रणेस दिले.
फटाके विक्री परवान्यांचे तांत्रिक कारणास्तव नूतनीकरण न झाल्याने दिवाळीच्या काळात तात्पुरते परवाने देण्याचे अादेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मालाड फायरवर्क्स वेल्फेअर असोसिएशनने हायकोर्टात दाखल केली होती. न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्या. एन.एम.जामदार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी घालण्याची जनहित याचिका दाखल करत यंत्रणेने फटाके विक्रेत्यांची तपासणी करावी, अशी मागणी चंद्रकांत लासुरे यांनी केली होती.