मनोरूग्णालयांकडे सकारात्‍मकतेने पाहणे गरजेचे – आरोग्य मंत्री

0
13

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मंत्रालयात मनोरूग्णांनी तयार केलेल्या वस्‍तूंचे प्रदर्शन

मुंबई, दि. 16 : मनोरूग्णांकडून एकाग्रतेने आकर्षक वस्तू बनवून त्यांच प्रदर्शन भरवणे ही स्पृहनीय बाब आहे, मनोरूग्णालय बदलत असून लोकांनी आता त्यांच्याकडे सकारात्मक भावनेने एका वेगळ्या नजरेने बघणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.  जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शासनाच्या आरोग्य विभाग,उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे व प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात मनोरूग्णांनी दिवाळी निमित्त तयार
केलेल्या हस्तकला, वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
आरोग्य मंत्री म्हणाले, अशाप्रकारचे उपक्रम अत्यावश्यक आहेत.जिल्हास्तरावरही असे उपक्रम भरवावे, अशा सूचना  संबधितांना दिल्या असल्याचे मंत्री श्री. सावंत यांनी सांगितले. या प्रदर्शनात मनोरूग्णांनी तयार केलेले विविध आकर्षक वस्तूंचे वीस स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यात पेपर बॅग, फाईल्स, पुष्प गुच्छ, आकाश कंदील, पणत्या, दागिने, पेंटींग, पेपर प्लेट्स, आदींचा समावेश आहे. यात ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे 16, पुणे व रत्नागिरी रूग्णलयातील रूग्णांचे प्रत्येकी दोन स्टॉल लावण्यात आले आहेत. यासह मानसिक तणाव, त्यांचे परिणाम, लक्षणे, काळजी यावर जनजागृती करण्यासाठी प्रदर्शनी स्थळी विविध पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. सकाळच्या सुमारास
विद्यार्थ्यांनी कार्यालयीन मन:स्वास्थ यावर मार्गदर्शनपर पथनाट्य सादर केले.यावेळी मुंबई मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे,ठाणे प्रादेशीक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर रावखंडे आदी उपस्थित होते.