एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; राज्यभरात प्रवाशांचे हाल

0
8

मुंबई,गोंदिया, नाशिक,दि.17 : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेल्या या संपामुळे मूळगावी सण साजरा करण्यासाठी जाणार्‍या सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. पंधरवड्यापूर्वी अगोदर संपाची नोटीस देण्यात आली होती; मात्र सरकारने तोडगा काढला नाही. यामुळे संपाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.गोंदिया स्थानकातून आज सकाळपासूनही एकही बस न सोडल्याने प्रवाशांच्या चांगलेच बेहाल झाले.तर खासगी बसचालकांना संपाचा आज चांगलाच लाभ घेता आला.
एसटी कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला शहरात शिवसेनाप्रणीत एसटी कामगार सेना वगळता सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यामुळे नाशिक विभागातील सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

मुंबई : दादर- पुणे ( पिंपरी, चिंचवड) मार्गावरील शिवनेरी बससाठी मोठा प्रवासी वर्ग आहे. दादर येथून दर 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने शिवनेरी बस धावते. सकाळी एक्स्प्रेसनंतर पुणे शहरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी शिवनेरी सोईचे ठरते. यामुळे स्थानकावर नेहमीच गर्दी होती.  मात्र संप काळात शिवनेरी स्थानक सुन्न आहे.एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत शासनाने पर्यायी व्यवस्थेची तयारी केली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकी बस आणि मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता दिली आहे.

रत्नागिरी – विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या एस्. टी. बंदमध्ये महाराष्ट्र एसटी. कामगार सेना सहभागी झालेली नाही.  त्यामुळे गुहागरमध्ये अंशतः एस्. टी. वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. ज्यावेळी बस स्थानकात लावण्यात आली तेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला आणि काही बसेस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाल्या.

पुणे – सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे पुण्यात प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. पहाटेपासून स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एस टी स्टँडवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे.  कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासूनच काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रात्रीपासूनच काही प्रवाशांना स्टँडवर थांबावे लागले आहे. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नाहीत.