जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण- राम शिंदे

0
13

नाशिक, दि.13 : जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पण बदलत्या स्थितीनुसार शेतीसाठी मुबलक पाणी वापर करु नये,पीकनिहाय ठिबक अथवा स्प्रिंकलर सारख्या सिंचन पध्दतीने पाण्याचा नियंत्रीत वापर करावा असे आवाहन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.
येवला तालुक्यातील कातरणी येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहाणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. शिंदे यांनी वनविभाग, कृषी विभागांनी केलेल्या कामांची पाहाणी केली. तसेच तालुक्यातील विसापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळे, विहीरींच्या पाणी पातळीची पाहाणी करुन त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांचे समवेत उपवनसंरक्षक रामानुजम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी.ए. जगताप, कार्यकारी अभियंता शिंदे, उपविभागीय अधिकारी भिमराव दराडे आदी उपस्थित होते.श्री. शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात झालेल्या कामाचा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे दिसून आले आहे.जीडब्लूएस या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये  जमीनीतील पाणीपातळी वाढल्याचे दिसून आले आहे. याची प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी नाशिक विभागातील तीन जिल्ह्यातील गावांमध्ये अचानक पाहाणी दौरा करत असून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून
घेण्याचा शासनाचा उद्देश आहे.
ते म्हणाले, या गावांमध्ये विहीरींना पूर्वी पावसाळ्यानंतर पाणी राहात नव्हते असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. पण आता या कामांनंतर सध्या पाणी असून त्यामध्ये कांद्याचे पीक घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. या पाण्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. जलयुक्त योजनेतून यालुक्यात व जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये कामे घेण्याचे नियोजन शासनाच्या विविध विभागांकडून केले जात आहे. भविष्यात याचा फायदा मिळेल, असे मंत्री श्री.शिंदे म्हणाले.
मंत्री राम शिंदे यांनी  सौंदाणे येथील जलयुक्त शिवार योजनेतून जलसंपदा विभागाने केलेल्या कामांची पाहाणी करुन बंधाऱ्यातील पाणी साठ्याचे जलपूजन करुन त्याचे लोकार्पण केले.यावेळी मंत्री श्री शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार मधून येथे परसूल नदीवर आठ साखळी साठवण बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी सात बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून त्यामधील त्यापैकी या 25 टीसीएम पाणी साठा असलेल्या बंधाऱ्यातील पाणी साठ्याचे जलपूजन करण्यात येत असल्याचे समाधान आहे.