प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती आपले दायीत्व पूर्ण करणे आवश्यक-मुख्यमंत्री

0
24

मुंबई, दि. 13 :  सामाजिक कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायीत्व असून प्रत्येक नागरिकाने आपले सामाजिक दायित्व पूर्ण करणे आवश्यक आहे.नागरिक, सामाजिक संस्था आणि शासन या तिघांनीही समन्वयाने काम केल्यास देशाच्या विकासात मोठी झेप घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
द.सि.एस.आर जर्नल या संकेतस्थळ चालविणाऱ्या संस्थेच्या वतीने आयोजित सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा एक्सलंस अवॉर्ड प्रदान करण्याचा समारोह आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, राज्यशासनाकडे असलेले मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्यामार्फत आणि खासगी संस्थाकडे असलेली कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानाच्या सहभागाने राज्यात अनेक चांगले उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.सुमारे एक हजार गावांचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी गावातीलच 300 युवा पुढील दोन वर्षे काम करणार आहेत. राज्याने सुरु केलेला हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.मायक्रोसॉफ्ट या कंपनीमार्फत व्हाईट स्पेसचा वापर करुन मेळघाटमधील हरिसाल सारख्या अतिदुर्गम भागात कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे. यामार्फत अंगणवाडी, शाळा, प्राथमिक उपचार केंद्रे डिजिटली जोडली
गेले. टेलीमेडीसीन आणि इतर तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे कुपोषणासारख्या समस्येवरही मात देता आली आहे.
आरोग्य , शिक्षणासोबतच अदिवासी लोकांनी तयार केलेले उत्पादन ॲमॅझॉनवर विकायला ठेऊन जागतिक स्तरावरची ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देता आली आहे. हरिसालची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली असून हा प्रकल्प प्रधानमंत्री पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आला आहे.जलयुक्त शिवाराच्या कामातही अनेक खासगी संस्थांनी उत्कृष्ट कागगिरी केली आहे. सिएसआरच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांची कामे करता येणे शक्य झाले आहे. असे सांगून ज्या व्यक्तींनी किंवा संस्थाना सामाजिक कार्यात सहभाग द्यायचा आहे त्यांच्यासाठी राज्याने ‘सहभाग’ नावाचा उपक्रम सुरु केला असून यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, द.सि. एस. आर. जर्नल संकेतस्थळाचे अमीत उपाध्याय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विमान वाहतूक क्षेत्रातील कामगिरीसाठी कॅप्टन ए.व्ही. माणिक,शैक्षणिक क्षेत्रासाठी विनय कुमार रेड्डी नुवूरु, आरोग्य क्षेत्रासाठी सिद्दीकी बाबला, करिअर काऊन्सलींगसाठी डॉ.तुशारा देवरा, तंत्रज्ञान क्षेत्रासाठी क्रिष्णा सोमय्या, पर्यावरणासाठीसाठी झाहिद विजापूर,सामाजिक कार्यासाठी बी. सिंग आणि अपंगांसाठीच्या कार्यासाठी कौशिक परिचा
यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ॲवार्डसाठी ज्युरी म्हणून आपले योगदान दिले. अपंग मुलांनी यावेळी व्हिलचेअरवर आपल्या नृत्याविष्कार सादर केली.