महावितरणची मंगळवारपासून ‘शून्य थकबाकी’ मोहिम

0
16

गोंदिया(खेमेद्र कटरे)दि.20 : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम उद्या मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी त्यांचेकडील थकीत वीजबिलाचा भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

सप्टेंबर २०१७ अखेरीस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत ३९ लाखाहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक असून त्यांचेकडील जिल्हावार थकबाकी नागपूर (२७.३९ कोटी),गोंदिया  (१२.९९ कोटी),भंडारा  (६.४३ कोटी), वर्धा (९.४ कोटी), अकोला (३२.३७ कोटी), बुलढाणा (२९.०६कोटी), वाशिम (२१.५१ कोटी), अमरावती (३२.४७ कोटी), यवतमाळ (२७.६६ कोटी), चंद्र्रपूर (१०.९६ कोटी), आणि गडचिरोली (५.६४ कोटी)अशी  एकूण २०९ कोटी ६५ लाख रुपये थकबाकी आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील गोंदिया,नागपूर, चंद्रपूर,अमरावती आणि अकोला या पाचही परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे मार्च महिन्यात ४५ कोटी ४४ लाखांवर असलेली थकबाकी सात महिन्यांत तब्बल २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर पोहचली.त्यामुऴे  महावितरणने या थकबाकीच्या वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेअतंर्गत ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश देत थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत,गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी आणि चारही परिमंडळाचे मुख्य अभियंत्यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मागिल आठवड्यात राबविलेल्या मोहीमेत थकित वीजबिलांचा भरणा न करणाºया नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ८ कोटी ९१ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित केला होता. यात गोंदीया परिमंडलात १ हजार ४३३ ग्राहकांचा (५४ लाख),नागपूर परिमंडल- ५ हजार ८४६ (१कोटी ७२ लाख), अकोला परिमंडल- ४ हजार ९८५ (३ कोटी), अमरावती परिमंडल- ५ हजार ६२१ (३ कोटी १३ लाख) तर चंद्रपूर परिमंडल- १ हजार ५९३ ( ६३ लाख)  वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.