महापौरांच्या पीएला 16 हजारांची लाच घेताना अटक

0
11

कोल्हापूर- शहराच्या महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तृप्ती माळवी व त्यांच्या स्वीय सहायकांना 16 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी ‘एसीबी’ने ताब्यात घेतले अाहे.
संतोष हिंदूराव पाटील यांची शिवाजी पेठेतील जागा 1954 मध्ये महापालिकेने ताब्यात घेतली होती. ही जागा परत मिळवण्यासाठी पाटील प्रयत्नशील होते. स्थायी समितीसमोर त्यांचा अर्ज मंजूर होऊन जागा परत देण्याचा निर्णयही झाला होता. मात्र, महापौर तृप्ती माळवी यांच्या स्वाक्षरीसाठी हा अंतिम निर्णय रखडला हाेता. या सहीसाठी माळवी यांनी त्यांचे स्वीय सहायक अश्विन गडकरी (रा. संभाजीनगर) यांच्याकरवी पाटील यांच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली हाेती. अखेर १६ हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेच्या आवारातच पाटील यांनी गडकरी यांच्याकडे १६ हजार रुपये दिले. यानंतर त्यांनी महापौरांशी बोलण्याचा आग्रह धरला. त्यानुसार पाटील आणि गडकरी महापौर माळवी यांच्याकडे गेले. त्यांच्या अँटीचेंबरमध्ये तिघांमध्ये चर्चा झाली. ‘पैसे मिळाले आहेत, आता काम होईल’ असे महापाैरांनी सांगितले. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी येथे छापा टाकून ताब्यात घेतले.
महापाैरांच्या सांगण्यावरूनच अापण पैसे घेतल्याचे गडकरी यांनी चाैकशीत सांगितले. त्यानुसार गडकरींना अटक करण्यात आली, तर माळवी यांना रात्री अटक करण्यात कायदेशीर बंधन असल्याने त्यांना अधिकृतपणे शनिवारी अटक करण्यात येणार आहे.