राज्यघटना बदलणे हाच भाजपचा अजेंडा

0
12

नागपूर – भारतीय जनता पक्षाचा मूळ उद्देश राज्यघटना बदलणे हाच आहे. या उद्देशपूर्तीसाठी देशातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादाच्या सिद्धांताला मूठमाती दिली गेली. धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी “घर वापसी‘पासून तर “गीते‘ला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावे, असे विषय हाताळून वातावरण गढूळ केले जात आहे. हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबवण्यासाठी भाजप सरकारकडून जनतेची चाचपणी होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मुक्तविचारपीठ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. देशाच्या विकासाच्या योजनांचे आम्ही स्वागत करू. परंतु, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाल्यास संयुक्त महाराष्ट्राच्या धर्तीवर किंवा 1947 साली झालेला संघर्ष पुन्हा एकदा कॉंग्रेसला करावा लागेल, असा निर्धारही चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवला. पंतप्रधान मोदी यांनी सर्वोच्च पदावरून धर्मनिरपेक्ष देश असल्याचे जाहीर करावे. परंतु, तसे होत नाही, मोदी मौन बाळगून आहेत, असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दबावाखाली काही प्रकल्पाच्या परवानगी तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी रोखल्या असल्याचा आरोप चुकीचा असल्याची प्रतिक्रियाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. नटराजन यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे, असेही चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी आजवर कोणावरही दबाव आणला नाही, असे सांगत राहुल गांधींची बाजू घेतली. हे सांगत एखाद्या मंत्र्याने संविधानाची शपथ घेतल्यानंतर त्यानुसार काम करणे गरजेचे आहे. परंतु, त्यांनी कायदा मोडत काम केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई व्हावी असेही चव्हाण म्हणाले.

आघाडी सरकारमधील मतभेद उघड झाले होते
केंद्रात पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्रातही अनपेक्षित पराभव झाला. कॉंग्रेसमध्ये नैराश्‍य आले नाही, तर किंबहुना आघाडी सरकारमधील मतभेद उघड झाले होते. शिवाय सलग 15 वर्षे सत्तेवर असल्याने जनतेलाही कंटाळा आला असेल, यामुळेच सरकारचा पराभव झाला. कॉंग्रेसमधून जे गेले ते स्वार्थाचे राजकारण करीत आहेत. कॉंग्रेस हा विचार आहे. जो विचार मानतो तो कॉंग्रेस सोडत नाही, असेही एका प्रश्‍नाच्या उत्तरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.