२५२३ लक्षवेधी दाखल; ३५ मोर्चे व १८ धरणे मंडपांसाठी आले अर्ज

0
21

नागपूर,दि.7 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. राज्यभरातील आमदारांकडून येणाऱ्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव स्वीकारले जात आहे. विधानसभा व विधान परिषदेसाठी एकूण २५२३ लक्षवेधी दाखल झाल्या आहेत. विधानसभेसाठी १७९० लक्षवेधी, ९६७५ तारांकित प्रश्न, १८६ अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव व ४०१ अशासकीय प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अशोक मोहिते यांनी लोकमतशी बोलताना दिली. विधान परिषदेसाठी ७३३ लक्षवेधी, २९१६ तारांकित प्रश्न, १६३ अशासकीय प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावर्षी हिवाळी अधिवेशनात तीन नवे विधेयक व १२ अध्यादेश सादर केले जातील. विधानसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक व विधान परिषदेत प्रलंबित ५ विधेयक देखील सादर होतील.
सूत्रांंच्या मते अधिवेशन वाढविण्याचा निर्णय झाला तरी फक्त एक दिवस वाढविले जाईल. २३ डिसेंबर रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल. २४ डिसेंबर रविवार व २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसची सुटी येत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी तयारी जोरात सुरू आहे. देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढून, धरणे देऊन आपल्या मागण्या, प्रश्न सरकार दरबारी पोहचविण्यासाठी आंदोलक सज्ज झाले आहेत. आजवर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा ३५ संघटनांनी पोलिसांकडे मोर्चाची परवानगी मागितली आहे. पटवर्धन मैदानावर धरणे देण्यासाठी १८ संघटनांनी विशेष शाखेकडे अर्ज केले आहेत.