माओवांद्याच्या कारवाईनंतर जवानांचे जंगी स्वागत

0
21

गडचिरोली,दि.8ः-जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करून सात माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या सी-६०च्या जवानांचे गुरुवारी गडचिरोली पोल‌िस दलाकडून रेड कार्पेट टाकून जंगी स्वागत करण्यात आले. जवानांनी ढोल-ताशाच्या गजरात यशाचा आनंद साजरा केला. दरम्यान, या जवानांना सात लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशीही गडचिरोली-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांच्या विरोधात पोल‌िसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करून धडक कारवाई केल्याने या चकमकीत यश मिळाल्याचे मानले जात आहे.सिरोंचा तालुक्यात माओवाद्यांच्या हालचालीची माह‌िती मिळाल्यानंतर सिरोंचाचे उपविभागीय पोल‌िस अधिकारी गजानन राठोड यांनी अलीकडेच सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आणि पोल‌िस अधीक्षक अभिनव देशमुख यांना त्यांच्या कारवायांची कल्पना दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोल‌िस अधिकाऱ्यांनी व्युहरचना केली होती. गेल्या दोन मह‌िन्यांपासून सी-६०चा कमांडर मोतीराम मडावी याचाही सिरोंचात मुक्काम होता. १५ दिवसांपूर्वीच धडक कारवाई करण्याची तयारी करून सिरोंचाचे उपविभागीय अधिकारी गजानन राठोड आणि झिंगानूर ठाण्यातील सी-६०चे पथक आसरल्ली ते पातागुडमच्या जंगलात गेले होते. मात्र तोपर्यंत माओवादी निघून गेले होते. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून खबऱ्यांच्या योग्य नेटवर्कचा वापर करीत संधी मिळताच धडक कारवाई करण्यात आली. या चकमकीत सात माओवादी ठार झाले. घटनास्थळ असलेला परिसर घनदाट जंगलाने आणि पहाडाने वेढलेला असल्याने धोकादायक असलेल्या भागातुन माओवाद्यांचे मृतदेह काढून झिंगानूर ठाण्यात आणण्यात आले.

मोतीराम मडावी या चकमकीचा कर्णधार असुन तो सी सिक्स्टी कमांडर आहे. सध्या सहाय्यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे दक्षिण गडचिरोली जिल्हयातल्या विशेषत सिरोंचा आणि अहेरी भामरागड तालुक्यातल्या माओवादविरोधी अभियानातल्या यशस्वी चकमकी मोतीरामच्या नेतृत्वात घडल्या आहेत 1987 मध्ये गडचिरोली पोलीस दलात भरती झालेला मोतीराम मडावीच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यात झिंगानुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 28 नोव्हेंबर 2003 ची चकमकीत जनशक्ती दलमचे पाच माओवादी ठार झाले होते. तर याच वर्षी सिरोंचा तालुक्यात चिटुरच्या जंगलात दोन माओवादी ठार झाले होते. मोतीरामकडे खब-याच यशस्वी नेटवर्क आहे