जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी काढला मुंडण मोर्चा

0
14

गोंदिया,दि.18 : जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला. मोर्चातील वितेश खांडेकर, गोविंद उगले, सुनील दुधे, आशुतोष चौधरी, प्राजक्त जावरे, नामदेव मेटांगे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युईटी लवकरच देऊन त्याबाबतचा जीआर काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून डीसीपीएस/एनपीएस नावाची नवी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनाच सुरू ठेवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन केले. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडविला. जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी मृत, सेवानिवृत्त झाल्यास पेन्शनचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यात आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांनी मुंडण करीत मोर्चात सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व वितेश खांडेकर, गोविंद उगले, सुनील दुधे, प्रवीण बडे,संदिप सोमवंशी,मनोज मानकर,मनिषा मडावी,सर्जेराव सुतार,आसुतोष चौधरी,प्राजक्त झावरे,पृथ्वीराज कोल्हटकर,शैलेष राऊत,प्रविण गायकवाड,उमेश पाडवी,प्रविण गायकवाड,आशिष रामटेके,पुरुषोत्तम हटवार,अनिल वाकडे, आदींनी केले. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे मृत्यू व सेवानिवृत्त उपदानाचा लाभ द्यावा, नवीन कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे शासन निर्णय रद्द करावे आदी मागण्या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.या मोर्च्याला माजी खासदार नाना पटोले,आमदार कपील पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.गोंदिया,भंडारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.