23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ भंडारा मनरेगा मॉडेल इतर जिल्हयाने राबवावे– मुख्यमंत्री

भंडारा मनरेगा मॉडेल इतर जिल्हयाने राबवावे– मुख्यमंत्री

0
28

·               चुलबंद नदीवर बंधारे बांधा
·               वनक्षेत्रात जलयुक्तची कामे करा
·                वैनगंगा नदीला प्रदुषण मुक्त करणार
·               फिरत्या पोलीस ठाण्याचे कौतुक
·               अवैध रेती वाहतुकीला आळा घाला

भंडारा दि. 18 : जिल्हयात स्थनिकाना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध विकास काम करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्हयाने चांगले काम केले आहे. त्यामुळे मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी या योजनेचा उपयोग झाला आहे. मनरेगाची मजुरी अदा करण्यासाठी भंडारा जिल्हयाने विशिष्‍ट कार्यपध्दती अवलंबली त्यामुळे मजुरांना वेळीच कामाचा मोबदला मिळण्यास मदत झाली आहे. भंडारा जिल्हयाचे हे मॉडेल राज्यात राबविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधान भवनातील सभागृहात 18 डिसेंबर रोजी भंडारा जिल्हयाच्या विकास कामाचा आढावा घेतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, ॲड रामचंद्र अवसरे, राजेश काशीवार, मुख्य सचिव सुमीत मल्लीक, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, भंडाराचे पालक सचिव रजनिश सेठ, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलिस अधिक्षक विनीता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी व विविध विभागाचे वरिष्ठ व प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सन 2019 पर्यंत प्रधानमंत्र्यांचे सर्वांना घर देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, आदिवासी लाभार्थ्यांना शबरी योजनेतून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना रमाई घरकूल योजनेतून व अन्य लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून, घरकूल देण्यात यावे. त्यामुळे त्यांना हक्काचा निवारा मिळण्यास मदत होईल. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असेल व ते त्याचा नियमित वापर करतील यासाठी जनजागृती करण्यात यावी. मेक इन महाराष्ट्रामध्ये सामंजस्य करार केलेल्या कंपन्यांशी उद्योग सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. त्यामुळे जिल्ह्यात उद्योग उभे राहतील व त्याद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल यादृष्टीने देखील नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्प नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. वैनगंगा नदीवर असलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत थकीत असलेले बिल तातडीने भरण्यात यावे.
जिल्ह्यात टसर रेशीम उत्पादनासोबतच तूती लागवड करुन अधिक रेशीम उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत करावे. वैनगंगा नदीत नागनदीचे दुषीत पाणी जात असल्यामुळे या पाण्यावर पुन:प्रक्रिया करुन त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करावा. सोबतच गोसेखूर्द प्रकल्पात हे दूषित पाणी जाणार नाही व त्यामुळे मासे मरणार नाही. यासाठी नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. पदमान्यतेशिवाय रुग्णालयाला निधी न देण्याचे धोरण शासनाने स्विकारले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महिला रुग्णालय, नाट्यगृह, नवीन प्रशासकीय इमारत,उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व भंडारा रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली. नवोदय विद्यालय तातडीने पूर्ण करावे. तुमसर विधानसभा मतदार संघातील अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा. दोन केटीवेअरसाठी निधी द्यावा. भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर रेतीघाट चालविण्याकरिता सीएसआरच्या दरानुसार ग्रामपंचायतीला अधिकार द्यावे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात
मृत्यू झालेल्या प्रकरणात पोलिसांचा प्राथमिक चौकशी अहवाल ग्राह्य धरावा यासह अन्य मुद्दे आमदार चरण वाघमारे यांनी मांडले. बंद पाणी पुरवठा योजनाबाबत तसेच पाणी वितरणाबाबत कार्यवाही करावी. यासह आमदार राजेश काशीवार व ॲङ रामचंद्र अवसरे यांनी आपल्या क्षेत्रातील विविध समस्या यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी श्री. दिवसे यांनी जिल्ह्याचे सादरीकरण केले.