राज्यास धर्म नसणे;हीच धर्मनिरपेक्षता:उपराष्ट्रपती

0
11

मुंबई – धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ राज्यास कोणताही विशिष्ट धर्म नसणे, असा असल्याचे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले.

“धर्मनिरपेक्ष हा शब्दाचा खरा अर्थ काय? आपल्या समाजामध्ये विविध धर्मांचे नागरिक एकत्रितरित्या राहत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या नागरिकांना सामावून घेणे हे खरे आव्हान आहे. तेव्हा राज्यास स्वत:चा विशिष्ट असा कोणताही धर्म नसणे, हा धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ आहे,‘‘ असे उपराष्ट्रपतींनी दक्षिण मुंबईमधील विल्सन महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

“राज्याने धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करु नये. शिष्यवृत्ती, विकासाचे कार्यक्रम व योजना वा इतर कोणत्याही बाबींमध्ये राज्याने धर्म, लिंग वा इतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करु नये,‘‘ असे अन्सारी म्हणाले. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने राज्यघटनेच्या मूळ उद्देशपत्रिकेमधून (प्रिअँबल) धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द गाळल्याने सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर उपराष्ट्रपतींचे हे मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे