राज्यातील बालगृहाच्या आधुनिकीकरणासाठी शासन प्रयत्नशील – विद्या ठाकूर

0
16

मुंबई : राज्यातील बालगृहाच्या आधुनिकीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बालगृहात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी सांगितले.

चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहास महिला व बालविकास राज्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी माधव भंडारी, महिला व बाल विकास विभागाचे सहायक आयुक्त जे.बी. गिरासे, बालगृहाचे अधीक्षक के.बी. गायकवाड उपस्थित होते.

राज्यातील बालगृहांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच वित्तमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. तसेच या सुधारगृहातील मुले व मुलींच्या कल्याणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर म्हणाल्या. यावेळी त्यांनी मतिमंद मुलांच्या वस्तीगृहास भेट देऊन मुलांशी संवाद साधला. चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या बालगृहातील वसतीगृह, वैद्यकीय सुविधा, कार्यशाळा तसेच या मुलांसाठी घेतले जाणारे मनोरंजनात्मक उपक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.