देशाच्या प्रगतीसाठी इंधन बचत आवश्यक- गिरीश बापट

0
13

मुंबई, दि. 16 : विद्यार्थ्यांना, वाहन चालकांना तसेच इंधनाचा वापर
करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना इंधन बचत करण्याचे प्रशिक्षण देऊन इंधन
बचतीसाठी जनजागृती करणे, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले सक्षम (संरक्षण क्षमता
महोत्सव) या कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत पेट्रोलियम कंझर्वेशन
रिसर्च असोसिएशन (पि सी आर ए) या संस्थेद्वारे इंधन बचतीसाठी जनजागृती
करण्यासंदर्भात वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. याचाच एक भाग
म्हणून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येणार आहे. सक्षम संरक्षण
महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रूवरी 2018 या
दरम्यान संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ‘इंधन संरक्षण की
जिम्मेदारी, जन गण की भागीदारी’ अशी आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन
यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडले. यावेळी वैधमापन शास्त्र विभागाचे
नियंत्रक अमिताभ गुप्ता तसेच विवीध तेल कंपन्यांचे प्रतिनीधी उपस्थित
होते.
श्री. बापट पुढे म्हणाले, केंद्र शासन, सर्व तेल कंपन्या आणि
पि सी आर ए या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम अत्यंत
स्त्युत्य असून सर्व स्तरातून याला चांगला प्रतिसाद मिळेल. इंधन बचतीचे
कार्य हे लोकसहभागातूनच यशस्वी होऊ शकेल. यासाठी इंधन बचतीचे प्रशिक्षण
देणे आवश्यक आहे. आवश्यक असेल तेवढेच इंधन वापरणे, गरज नसेल तेव्हा
गाडीचे इंजीन बंद करणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास
इंधन बचतीत प्रत्येक व्यक्ती हातभार लावु शकतो.
यावेळी इंधन बचत विषयाशी निगडीत विविध स्पर्धांच्या विजेत्या
शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तर जनजागृती करणाऱ्या
चित्ररथाचेही उद्‍घाटन करण्यात आले.