प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली, राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांचा एल्गार

0
15

मुंबई,दि.25- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी त्याची छेडछाड रोखण्यासाठी संविधान बचाव रॅली आम्ही काढणार आहोत, असं प्रतिपादन  राजू शेट्टी यांनी केलं आहे.
अनंतकुमार यांनी हे विधान सत्ताधारी असल्यानं केलं आहे, राज्यात सत्ता असली तरी तुम्हाला राज्य घटना बदलू देणार नाही. जनतेने सत्ता दिली ती विकासासाठी घटनाबदलासाठी नाही. विकासासाठी मते मागून घटनाबदलाचा कार्यक्रम राबविण चुकीचं आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांनी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
देशात विविध प्रवाह वगैरे असतानाही देश घटनेमुळेच एकत्र राहिला आहे. म्हणून आम्ही संविधान बचाव रॅली काढली आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. आमची रॅली प्रतीकात्मक आहे. याला उत्तर म्हणून भाजपाने तिरंगा रॅली, संविधान सन्मान रॅली काढायची गरज नव्हती. पण ती काढतायत याचा अर्थ चोराच्या मनात चांदण, अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते  जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. तरुणाईत सध्या अस्वस्थता आहे. विशेषतः विद्यापीठ कॅम्पसमध्ये अस्वस्थता आहे. घटनाबाह्य शक्तींच्या माध्यमातून घटना संपविण्याचे, बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे. अनंतकुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदार मंत्री उघडपणे घटना बदलाची भाषा करत आहेत. तेव्हा संविधान बचावासाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, सुशीलकुमार शिंदे, डी. राजा, तुषार गांधी, अल्पेश ठाकूर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते यात सहभागी होत आहेत.
आमच्या रॅलीला उत्तर म्हणून तिरंगा रॅलीची भाजपाने घोषणा केली. पण, याच तिरंगा रॅलीला संघ-भाजपाने विरोध केला जोता. १४ ऑगस्ट १९४७ च्या ऑर्गनायझरच्या लेखात तिरंग्याला विरोध केला होता. ज्यांनी तिरंग्याला आपला मानला नाही ते आज तिरंगा सन्मान रॅली काढत आहेत. त्यामुळे आधी तुमच्या पूर्वजांच्या भूमिकेबद्दल माफी मागा. संविधानातच तिरंगा रक्षण आणि सन्मानाची तरतूद केली आहे. त्यामुळे आधी संविधान वाचलं तर तिरंगा आपोआप वाचेल. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्या तिरंगा रॅली काढतायत. पण त्यांच्या लेटर हेडवर दीनदयाळ उपाध्याय यांचा फोटो असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असंही राजीव सातव म्हणाले आहेत.