जुन्या समीकरणात नवीन चेहर्यांना संधी !

0
11
– गोंदिया जि.प. सभापती निवड
– समाज कल्याणसाठी भाजपाकडून डोंगरे यांचे नाव आघाडीवर
– आरोग्य व शिक्षण सभापती पदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
गोंदिया, २५ जानेवारी
गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता सभापती पदाच्या निवडीचे वेध लागले आहे. आता पुढील अडीच वर्षांसाठी पुन्हा भाजपा-काँग्रेसची युती कायम असताना जुन्याच समीकरणानुसार कारभार चालण्याची चिन्हे आहेत. अशात दोन्ही पक्षातील इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांच्याही नजरा या निवडीकडे लागल्या आहेत.
३० जानेवारी रोजी सभापतींची निवड करण्यात येणार असून समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य व शिक्षण आणि महिला व बालकल्याण या चार पदासाठी तब्बल १० जणांच्या नावांची चर्चा होत आहे. यात समाज कल्याण सभापती पदासाठी भाजपाकडून तीन नावे पुढे येत असले तरी घोटी जिल्हा परिषद क्षेत्राचे विश्वजीत डोंगरे यांचे नाव आघाडीवर आहे. तर कृषी व पशुसंवर्धन सभापती पदासाठी देखील तीन नावांच्या चर्चा होत आहेत. अशात आरोग्य व शिक्षण सभापती पदासाठी काँग्रेसच्या गोठ्यात रस्सीखेच होत असून या पदासाठी दोनच नाव पुढे आली आहेत. तर महिला व बालकल्याण खात्यासाठीही तीन नावांची चर्चा होत आहे.
भाजपा व काँग्रेसचे राजकीय वैर जग जाहीर आहे. असे असताना गोंदिया जिल्हा परिषदेचे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी हा वैर बाजूला सारून युतीचे सुत जोडले. सन २०१५ ला जिल्हा परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादीचे २० सदस्य आणि भाजपाचे १७ सदस्य निवडून आले होते. अशात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बळ पाहता या दोन्ही पक्षाची सत्ता स्थापन होण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेसने आपल्या समविचारी राष्ट्रवादीला बाजूला सारून भाजपाशी युती करुन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवीन अध्याय जुळले होते. दरम्यान उपाध्यक्ष पदासह महिला व बालकल्याण आणि आरोग्य व शिक्षण सभापती काँग्रेसच्या गोठ्यातून तर उपाध्यक्ष पदासह समाजकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी भाजपाच्या खात्यात आली होती. अशात जिल्हा परिषदेचा अडीच वर्षाचा कारभार नुकताच संपुष्ठात आला असून पुढील अडीच वर्षासाठी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी आपली युती कायम ठेवली आहे.  तर यावेळीही अध्यक्ष पद काँग्रेसकडेच असून उपाध्यक्षपदी भाजपाच्या उमेदवारीची वर्णी लागली आहे. यावरुन दोन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठी जुनेच समीकरण कायम ठेवण्याचे इच्छूक असल्याचे दिसून येत असून समाजकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा भाजपाच्या उमेदवारांकडे येण्याची चिन्हे आहे. तर आरोग्य व शिक्षण आणि महिला बालकल्याण काँग्रेसकडेच राहील यात शंका नाही. दरम्यान समाजकल्याण खात्यासाठी भाजपाकडून विश्वजीत डोंगरे, मंदा कुंभरे, यांच्या नावाच्या चर्चा असून असे असले तरी विश्वजीत डोंगरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तर कृषी व पशुसंवर्धन सभापती पदासाठी शोभेलाल कटरे, शैलजा सोनवाने आणि लिल्हारे यांची नावे पुढे येत असून यापैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडते हे येणारे काळ सांगेल. त्यातच काँग्रेसच्या गोठ्यातून आरोग्य व शिक्षण सभापती पदासाठी रस्सीखेच होत असल्याचे चित्र असून या पदासाठी गिरीश पालीवाल व रमेश अंबुले या दोन नावाच्या चर्चा सुरू आहेत. तर महिला व बालकल्याण सभापती पदासाठी काँग्रेसच्या लता दोनोडे, सरिता कापगते, उषा शहारे यांच्या पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान चार पादासठी १० जणांच्या नावांची चर्चा जिल्ह्याच्या राजकाणारत होत असली तरी दोन्ही पक्षातील पक्ष श्रेष्ठी सदर सभापती पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात घालतात याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
भाजपा इतिहास बदलणार !…
गोंदिया जिल्हा परिषदेत सन २०१० पासून भाजपा सत्तेत आहे. अशात समाज कल्याण सभापतींचा इतिहास पाहता या विभागाचा कारभार आतापर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवाराकडेच देण्यात आले असून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचे दिसते. भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून सन २०१० ते २०१३ श्रावण राणा यांच्याकडे या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. तर सन २०१३ ते १५ कुशन घासले व २०१५ ते आतापर्यंत देवराज वडगाये यांनी पदभार सांभाळले आहे. यावरुन आता भाजपा इतिहास बदलून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला स्थान देणार असल्याच्या चर्चा जि.प.च्या वर्तुळात सुरू आहेत. विशेष म्हणजे विश्वजीत डोंगरे हे अनुसचित जाती या प्रवर्गातून असल्याने त्यांची निवड तेवढीच पक्की  असल्याचे बोलले जात आहे.