नागपुरात लिव्हर ट्रान्सप्लांटला आरोग्य विभागाची मंजुरी

0
9

नागपूर,दि.19 : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. ‘ब्रेनडेड’ (मेंदूमृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. यामुळे देशात अवयवदानात आघाडीवर असलेल्या तामिळनाडूनंतर महाराष्ट्र दुसऱ्या  क्रमाकांवर आला आहे. अवयवदानात नागपूरनेही आघाडी घेतली असून मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या मंजुरीनंतर आरोग्य विभागाने न्यू ईरा रुग्णालयाला लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी (यकृत प्रत्यारोपण) मंजुरी दिली आहे. राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपुरात हे केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती, रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी विभागीय प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) सचिव डॉ. रवी वानखेडे, रुग्णालयाचे संचालक न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा व यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ.राहुल सक्सेना उपस्थित होते. कार्डिओवॅस्कुलर व थोरायासिस सर्जन डॉ. संचेती म्हणाले, नागपुरात यकृत प्रत्यारोपण केंद्र नसल्याने रुग्णाला पुणे, मुंबई, औरंगाबाद किंवा दुसऱ्या  राज्यात जावे लागत असे. यात मोठा खर्च व्हायचा. परंतु आता नागपुरात न्यू ईरा रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण सुरू होणार असल्याने रुग्णांचा खर्च वाचेल. या शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असल्याने याचा फायदाही रुग्णांना मिळेल.