पीक विमा योजनेत सुधारणा आवश्यक – पालकमंत्री

0
12

नागपूर,दि.19 : गेल्या 13 फेब्रुवारीला जिल्ह्यात झालेल्या गारपिटीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे सर्वंकक्ष सर्वेक्षण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणारच आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचाही फायदा मिळावा ही शासनाची भूमिका आहे. पण पीक विमा योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काही सुधारणा आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
काटोल येथील आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या आंदोलन मंडपाला भेट देत त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, किशोर रेवतकर, मनोज जवंजाळ, लक्ष्मण मेहर, सुमंतराव रिधोरकर व अन्य उपस्थित होते.
या भागातील शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळणार नाही. पण दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी झाले पाहिजे. सर्वांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही अशा अनेक तक्रारी आहेत. सर्वांना पीकविम्याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून त्यात काही सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ 3 वर्षाचे हे सरकार आहे. या सरकारकडून 30 वर्षाच्या सरकारसारखी अपेक्षा करणे योग्य नाही. या राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा डायनामिक मुख्यमंत्री लाभला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांना मदत मिळावी म्हणून आ. देशमुख यांनी माझ्याकडे 9 मागण्यांचे निवेदन दिले असल्याचे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- येत्या 22 फेब्रुवारीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागण्यांवर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अधिक मिळावी म्हणून प्रयत्न करू. संत्र्यांच्या नुकसानभरपाईसाठी विशेष योजना तयार करण्यासंदर्भातही आपण प्रयत्न करणार आहोत. पालकमंत्र्यांनी असेही यावेळी सांगितले.
धोटे कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन 
काटोल तालुक्यातील ईसापूर खुर्द येथील शेतकरी प्रल्हाद मधुकर धोटे यांनी 17 फेब्रुवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर आज सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ईसापूर येथील त्यांच्या घरी जाऊन प्रल्हाद धोटे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिले.
गेल्या 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीने प्रल्हादच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले. पालकमंत्र्यांसोबत आज काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख, जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, किशोर रेवतकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. गारपिटीने शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असून या गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे गारपिटीने चांगलेच नुकसान झाले आहे. याप्रसंगी पालकमंत्र्यांकडे गावातील सर्व शेतकऱ्यांनी योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी जोरदार मागणी केली.