24 फेब्रुवारीला दिल्लीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार

0
12

पुणे- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 24 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत भूमी संपादन व शेतक-यांच्या प्रश्नावरून अण्णांच्या नेतृत्त्वाखाली नवी दिल्लीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वत: अण्णा हजारे यांनीच आज राळेगणसिद्धीत दिली.
अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला काही दिवसापूर्वीच आंदोलन करण्याबाबत इशारा दिला होता. मात्र, मोदी सरकारने अण्णांची कसलीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. लोकपाल अंमलबजावणी, भूमी अधिग्रहण, काळा पैसा व शेतक-यांच्या प्रश्नांबाबत अण्णांनी मोदी सरकारला पत्रे पाठवली आहेत. मात्र, मोदी सरकारने पत्राचे उत्तर पाठविण्याचेही सौजन्य दाखविले नसल्याची खंत अण्णांनी नुकतीच व्यक्त केली होती. याऊलट काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रत्येक पत्राचे उत्तर देतानाच तीन-तीन पानाची संबंधित विषयासंदर्भात माहिती देत असत. यावरून मोदी सरकारला किती अहंकार आहे हे स्पष्ट होते असे अण्णांनी म्हटले आहे.भूमी अधिग्रहण कायदा हा देशातील शेतक-यांना देशोधडीला लावणारा आहे. हा कायदा त्वरीत रद्द करावा अन्यथा दिल्लीत मोठे आंदोलन उभारू असेही अण्णांनी काही दिवसापूर्वी म्हटले होते. आता अण्णांनी इशारा देणे बंद केले असून थेट कृती करणार असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी केवळ एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे.