भिवंडीजवळ लॅाजिस्टिक हब उभारणार- मुख्यमंत्री

0
9

मुंबई : महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेत त्याची प्रचिती आली असून ‘मेक इन इंडीया’ च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ अशी वाटचाल सुरू झाली आहे. राज्य शासन ‘इज ऑफ डुईंग बिझीनेस’वर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच उद्योगांना पायाभूत सुविधा देण्यात येत असून भिवंडीजवळ लॅाजिस्टिक हब उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हॉटेल ट्रायडन्ट येथे गुरूवारी सकाळी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (फिक्की) यांच्यातर्फे आयोजित प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र 2015 परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. परिषदेला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुषण गगराणी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार सिंग, फिक्कीच्या अध्यक्षा डॉ. ज्योस्त्ना सुरी यांच्यासह राज्यातील उद्योजक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, दावोस येथील परिषदेत भारतात गुंतवणुकीसाठी पोषक असे वातावरण दिसून आले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. जास्तीत जास्त औद्योगिक गुंतवणूक राज्यात होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. परवानग्यांची संख्या कमी करण्याबरोबरच ई -पोर्टलचा वापरही करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता करण्याबरोबरच उद्योगांना पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.

राज्य शासनाने सुरू केलेले ‘आपले सरकार’ हे वेब पोर्टल सध्या मंत्रालय स्तरावरील असून त्यावर जनतेच्या तक्रारी, सूचना, अभिप्रायांची नोंद घेतली जात आहे. आता पुढील टप्प्यात तहसील स्तरावरील तक्रारीदेखील ह्या वेब पोर्टलवर दाखल करण्यात येतील, अशी सुविधा निर्माण केली जाणार आहे. नागरिकांना विशिष्ट कालमर्यादेत सेवा देण्यासाठी सेवा हमी विधेयक लवकरच आणत आहोत. त्यासाठी या विधेयकाचा मसुदा जनमतासाठी ठेवण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. उद्योगवाढीसाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना दिली.