विमानाच्या स्वच्छतागृहातून १.४९ कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त!

0
10

मुंबई- विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी केलेल्या कारवाईत १.४९ कोटींची सोन्याची बिस्कीटे हस्तगत करण्यात आली. मुंबईहून मस्कत येथे जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या स्वच्छतागृहात ६ किलो वजनाचे सोने सापडल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी, संबंधित विमान गुरूवारी दुपारपर्यंत सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात होते. मुंबईहून दुसऱ्या ठिकाणांसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात सोने सापडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान बुधवारी संध्याकाळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या ६ ई ८१ या विमानावर छापा टाकला. त्यानंतर अवघ्या वीस सेकंदात अधिकाऱ्यांना विमानाच्या स्वच्छतागृहात सोन्याची सहा बिस्कीटे मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. या विमानातील तीन स्वच्छतागृहांमधील वॉश बेसिनच्या मागे हे सोने कोणाच्यादृष्टीस पडणार नाही, अशाप्रकारे दडवून ठेवले होते.
अधिकाऱ्यांच्या मते, या विमानाने दुबई-कोलकाता-मुंबई-कोलकाता-मुंबई-मस्कत असा प्रवास केला होता.