बारावीचा टक्का घसरला, नागपूर विभाग ८७.५७ टक्के

0
13

पुणे,दि.30: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली.

विभागनिहाय टक्केवारीचा विचार केल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. कोकणचा निकाल 94.85 टक्के इतका लागलाय. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय. नाशिकचा निकाल 86.13 टक्के इतका लागला आहे. पदवीच्या दृष्टीनं महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी मुलांना मागे टाकलंय. उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी 92.36 इतकी असून 85.23 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.78 टक्के इतकी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १२ जून रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल.
राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली. यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विद्यार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यर्थिनी होत्या. विद्यार्थ्यांची शाखानिहाय आकडेवारी याप्रमाणे-
विज्ञान शाखा- 5 ,लाख 80 हजार 820 विद्यार्थी
कला- 4 लाख 79 हजार 863 विद्यार्थी
वाणिज्य- 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी
व्यावसायिक अभ्यासक्रम- 57 हजार 693 विद्यार्थी
विभागनिहाय टक्केवारी- 
कोकण – ९४.८५
पुणे – ८९.५८
नागपूर – ८७.५७
औरंगाबाद – ८८.७४
मुंबई – ८७.४४
कोल्हापूर – ९१.००
अमरावती – ८८.०८
नाशिक – ८६.१३
लातूर – ८८.३१

शाखानिहाय निकाल- 
विज्ञान – ९५.८५
कला – ७८.९३
वाणिज्य – ८९.५०
व्यवसाय अभ्यासक्रम – ८८.४१

कुठे पाहाल निकाल?
https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.