व्यवहार, कामगिरी आणि बांधिलकी जपा

0
9

मुंबई, दि. १ मार्च : मतदार संघातील व्यवहार, विधीमंडळातील कामगिरी आणि संघटनेशी बांधिलकी ही आमदारांसाठी यशाची त्रिसूत्री असून ही त्रिसूत्री जपल्यास पुन्हा पुन्हा निवडूण येणे, हे शक्य असते, हे कायम ध्यानात ठेवा, आणि त्या पद्धतीने पुढील काळात काम करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी आज केले.

भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा तीन दिवसीय अभ्यासवर्गाचा समारोप रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संकुलात तीन दिवस चाललेल्या अभ्यासवर्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय संघटन मंत्री रामलाल, सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी तसेच महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले.

पूर्वी अनेकवेळा निवडून येणे हे आजच्या तुलनेने सोपे होते, पण आता समाजाचे, लोकांचे, प्रसार माध्यमांचे सतत तुमच्यावर लक्ष असते. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. आपला स्वच्छ व पारदर्शक व्यवहार, मतदार संघातील संपर्क यावर लोक आपली प्रतिमा तयार करत असतात. म्हणूनच निवडून आल्यापासून पुढच्या निवडणूकीची तयारी आपल्याला करावयास हवी व त्यासाठी आपले वर्तन हे बदलता कामा नये. आपण विधानसभा, लोकसभा जिंकतो परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला हवे तसे यश मिळत नाही. याचा विचार करून आपल्या मतदार संघातील आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सहकारातील निवडणुकांची तयारी आता पासूनच करा, असे आवाहनही त्यांनी आमदारांना केले.

राज्यातील सरकार येऊन आत्ताशी तीन-चार महिने झाले आहेत. आपल्याला या राज्यात विकासाच्या योजना राबवायच्या आहेत. काही धोरणात्मक निर्णय आपण घेत आहोत, अशा वेळी धोरणात्मक बदल दिसायला काही महिन्याचा कालावधी लागू शकतो. राज्य सरकार अनेक चांगले निर्णय घेत आहे. आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात. या निर्णयांबद्दल लोकांत जाऊन सांगण्याचे काम तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी कटीबद्ध व्हा, असे ते पुढे म्हणाले.