मंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी ‘बहीण बीज’ भेट

0
13

मुंबई, दि. 24 : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोड केली आहे. यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये ‘बहीण बीज’ (भाऊबीज) त्यांनी मंजूर केली असून लवकरच सेविकांच्या बॅंक खात्यात ही भेट जमा होणार आहे.सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना ही भेट मिळणार आहे.

 एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ अंगणवाडी मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण दोन लाख सात हजार ९६१  मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे ‘बहिण बीज’ (भाऊबीज) भेट रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीमती मुंडे यांनी दिलेली दिवाळी भेटीची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बॅंक खात्यात लवकरच जमा होणार आहे. गेल्या वर्षी देखील दोन हजार रुपये’बहिण बीज’ त्यांनी सेविकांना दिली होती. या भेटीने आनंदित झालेल्या तमाम सेविका व मदतनीसांनी दिवाळी गोड केल्याबद्दल श्रीमती मुंडे यांचे आभार मानले आहेत.