हदगाव-हिमायतनगर तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा-भागवत देवसरकर यांची मागणी

0
12

नांदेड दि. 24 – कमी पर्जन्यमान, एक महिन्याचा पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेले पीक परतीचा पाऊस न आल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे हदगाव, हिमायतनगर तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून टंचाई उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तथा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यामार्फत केली आहे.
खरीप हंगामामध्ये सुरूवातीला चांगला पाऊस झाला होता. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडल्यामुळे पाणीपातळीसुद्धा खोल गेली आहे. परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे पिके हातातून गेली, तर जमिनीतील पाण्याचा ओलावा कमी झाल्याने रब्बी पिकेही येण्याची शाश्वती नाही. अल्प पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यातच राज्य सरकारने जिल्ह्यातील केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून इतर तालुक्यांना वेगळा निकष लावला. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडण्याची परिस्थिती सारखी असल्यामुळे याच अनुषंगाने जिल्ह्यातही तसेच हदगाव, हिमायतनगर तालुक्यातही कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी मागणीही भागवत देवसरकर यांनी केली आहे.
या निवेदनावर हदगाव तालुकाध्यक्ष विलासराव पाटील माने, दिनेश सूर्यवंशी, दीपक पवार, परमेश्वर काळे, संदीप वानखेडे, दिनेश जाधव, अमोल वाघीकर, अविनाश ताकतोडे, शेख रहीम, सुनील पाटील ताकतोडे, जनार्दन पवार, देवानंद कदम, अविनाश कदम, हरिदास कदम, पिंटू हुंडेकर, नागेश कदम, अनिल देवसरकर, शुभम तोष्णीवाल यांच्यासह हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.