अधिष्ठाता यांच्या औषध खरेदीच्या अधिकारात वाढ – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

0
15

मुंबई, दि. 28 : स्थानिक स्तरावर तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्ध व्हावी व रुग्णसेवेत खंड पडून नयेत यासाठी अधिष्ठाता (डीन) यांना स्थानिक औषध खरेदीचे अधिकार आहेत. ही मर्यादा आता पाच हजार रुपयांवरून एक लाख रुपये प्रतिदिन इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच मंजूर वार्षिक अनुदानाच्या 10 टक्के स्थानिक खरेदीची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. महाजन बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 जुलै 2017 च्या आदेशानुसार राज्यातील विविध रुग्णालयात लागणारी औषधे व शल्योपचार साहित्यांची खरेदी हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या खरेदी कक्षाकडून खरेदी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. 2018-19 या वर्षामध्ये औषधे व शल्योपचार सामुग्रीसाठी 339 कोटी 50 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्प‍ित करण्यात आला आहे. यापैकी औषधांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुमारे 116 कोटी 58 लाख इतका निधी हाफकीन महामंडळामार्फत औषध खरेदी करण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. तसेच उर्वरित निधी वितरित करण्याबाबताचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांचा औषध पुरवठा सुरळीत राहून रुग्णसेवेत खंड पडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असून यासाठी पुरेशी वित्तीय तरतूद करण्यात आली असल्याचे श्री. महाजन म्हणाले.
राज्यात अधिष्ठाता (डीन) यांची रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच प्रक्रिया पूर्ण करून रिक्त पदे भरण्यात येतील, असे श्री. महाजन एका उपप्रश्नाला उत्तर देताना पुढे म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, किरण पावसकर, अशोक उर्फ भाई जगताप, भाई गिरकर, सुरेश धस यांनी भाग घेतला.