राज्यसरकार देते आहे क्रिकेट बुकीला संरक्षण

0
9

मुंबई – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या हत्या होत असून पोलीस संरक्षणाची त्यांना खरी गरज आहे. मात्र अनिल जयसिघांनी सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना राज्य सरकार पोलीस संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप केला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर २६० अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावावर ते बोलत असताना केला.

मुख्यमंत्री यांचा राज्यातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा फोल आहे. पोलीस जागच्या जागी ज्या गुन्ह्यांवर कारवाई करता येते, ते गुन्हे न्यायालयात पाठवून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवत असल्याचा दावा केला. राज्याचे मुख्यमंत्री हे पोलीस महासंचालकांना भेटीसाठी वेळ देत नाहीत. त्यांच्यात बेनबनाव आहे का ? असा सवाल करून पोलीस दलातील विसंवाद मुंडे यांनी उघड केला.

ग्रामीण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना लक्ष करताना मुंडे म्हणाले की, गृहराज्य मंत्र्यांच्याच नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. वांबोरी गावात (अहमदनगर) प्रेमप्रकरणातून एका मुलाची नग्न धिंड काढण्यात येते. नगर जिल्ह्यातीलच दिपक कोलते या पोलीस शिपायाचा आरोपींकडून हत्या होते. या प्रकरणातील आरोपी भाजपशी संबंधित असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. गृहराज्यमंत्री सजंय दत्त सारख्या आरोपीच्या फर्लोबाबत ममत्व दाखवण्याची जाहिर भूमिका घेतात. पैसे खाण्याचा थेट सल्ला देतात. लातूरच्या गनिमी कावासारख्या दहशत माजवणाऱ्य संघटनावर बंदी घालण्याची मागणी यावेळी मुंडे यांनी केली.