पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

0
26
 शेखर भोसले /मुलुंड पूर्व,दि.30 :मुलुंड पूर्व येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील पालिका हद्दीतील उड्डाणपूल सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. या उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे वाहने उभी असतात. वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे जणू काही बेकायदा वाहनतळच तिथे झाले आहे असा भास होतो. उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना देखील अशाप्रकारे नियमांची पायमल्ली सुरू असून त्यामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न करण्यात येत होते परंतु नंतर कोण आडवे आले आणि कशासाठी हा निर्णय थांबविला काहीच समजले नाही असे स्थानिकांचे म्हणने आहे. वाहनतळासाठी पुलाखालील जागेचा उपयोग करण्यात येत असल्याने पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागी शोभेची झाडे लावून तो परिसर सुशोभित करावा, उद्यान बनवावे व पर्यावरणपूरक वातावरण बनवून जेष्ठ नागरिक व स्थानिकांची विसावण्याची सोय करावी किंवा तेही शक्य नसेल तर काही चांगल्या कार्यासाठी या जागेचा वापर करावा अशी स्थानिकांची मागणी आहे.
पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या अखत्यारीत हा उड्डाणपूल येतो. सर्वच उड्डाणपुलाच्या खाली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही, हेही खरे आहे. वाहतूक विभागदेखील या उड्डाणपुलाखालील गाड्या उचलायचे धाडस करत नाही.
उड्डाणपुलाखाली ईलेक्ट्रिक केबल्स व वायर्स देखील लोंबकळत असलेल्या दिसत आहेत. अडगळीच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग पकडून पुलाखाली उभ्या असलेल्या गाड्यांना आगीची झळ पोहचून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पुलालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या ठोस कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुंबईतील बहुतेक रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील सर्वच ठिकाणी अनधिकृत दुकानांनी ठाण मांडले आहे. भंगारवाले, झोपड्या, बेकायदा वाहनतळ आदींसाठी पुलांचा आधार घेतला जात आहे. उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित केला असता तर मुंबईच्या सुंदरतेत अजून भर पडली असती परंतु अनधिकृत गाड्या पार्किंग आणि अनधिकृत गेरेजवाल्यांमुळे मुंबईच्या सौंदर्याला बाधाच येत आहे. मात्र महापालिकेकडून कोणतेही ठोस धोरण अद्याप ठरवण्यात आलेले नाही. वाहतूक पोलीसही इतर प्राधिकरणाकडे बोट दाखवत असल्याने हा विषय ज्वलंत होत आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणात काही उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करण्यात आला होता. यावेळी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी याठिकाणी आकर्षक चित्रे काढून जनजागृतीपर संदेश दिले होते. याशिवाय काही पुलांखाली वृक्षारोपण देखील करण्यात आले होते तसेच सुशोभीकरण मुलुंड पूर्व उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचे करावे अशी मागणी आहे.