दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले

0
30

मुंबई,: राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व राज्य सल्लागार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी श्री. बडोले म्हणाले दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे. त्यात दिव्यांगांना शिक्षण, त्यांना उत्तम आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या धोरणाची प्रभावीपणे  अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची लवकरच स्थापना करणार आहे.

दिव्यांग कल्याण विभाग जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यान्व‍ित करणार. बार्टी, सारथी व समता प्रतिष्ठान यांच्या धर्तीवर दिव्यांग विकास प्रतिष्ठानची स्थापना करणार असून याचा मसुदाही विभागास सादर झाला आहे. दिव्यांगांच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करणार. शैक्षणिक क्षेत्रातही विशेष प्राधान्य दिले जाणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे.

दिव्यांगांना शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश दिले जातील. विशेष म्हणजे सार्वजनिक व खासगी क्षेत्रात दिव्यांगांना रोजगाराच्या समान संधी देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही श्री. बडोले यांनी सांगितले.